खालापूर : प्रतिनिधी
खालापुरातील लोधिवली येथील नामांकित शाळा असलेल्या सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर क्लारा, शिक्षिका प्रज्ञा म्हात्रे आणि प्रयोगशाळा सहाय्यक मथाई विरोधात पालक संतोष पांगत यांनी दिलेल्या तक्रारीनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 नोव्हेंबर 2019 रोजी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट कॉलेज लोधिवली येथे 11वीत शिकणारा आर्यन संतोष पांगत याला प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक सुरू असताना त्याच्या पोटात रसायन जावून अन्ननलिकेला दुखापत झाली होती. आर्यनच्या तोंडात अल्कली रसायन गेल्याने त्याला उलट्या होवून श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्याला चांभार्लीच्या रेगे रूग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात पाच दिवस उपचारानंतर आर्यनला रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले. अन्ननलिकेत रसायन गेल्याने अन्ननलिका आंकुचित झाल्याचे डॉक्टरानी सांगून एन्डोस्कोपी करावी लागेल असे सांगितले. आर्यनची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने पालकांनी पुन्हा बेलापूर येथील अपोलो रूग्णालयात दाखल केल्यावर आयनवर शस्ञक्रिया करण्यात आली. दिड लाख रूपये उपचारासाठी खर्च आर्यनवर झाला. इतर मुलांच्या बाबतीत देखील अशी दुर्घटना घडू शकते यासाठी आर्यनचे वडील संतोष पांगत यांनी चौक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देत व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली होती.
याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार अजय मोहिते हे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.