पंढरपूर ः प्रतिनिधी
भगव्या पताकांची दाटी… ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष… टाळ-मृदंगाचा गजर… पावसाची संततधार… चिखलात नाचणारे वैष्णव… अशा भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सोपानदेव महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरीत विसावले आहेत. रविवारी (दि. 10) आषाढीनिमित्त आपल्या लाडक्या विठूरायाला डोळे भरून पाहणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आषाढी एकादशीची वारी झाली नाही, मात्र या वर्षी कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने पंढरपूरच्या विठूरायाच्या वारीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे या वर्षीच्या वारीमध्ये वारकर्यांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात आपल्या लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपूरमध्ये जणू भक्तांचा मेळाच भरला आहे.
पंतप्रधान मोदींचा वारकर्यांना खास संदेश
सोलापूर ः कोरोनाचा प्रादूर्भाव काही अंशी कमी झाल्याने यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो वारकरी आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामार्फत लिखित स्वरूपात विशेष संदेशासह शुभेच्छा दिल्या आहेत. माझी भगवान विठ्ठल देवावरची श्रद्धा अढळ आहे. शतकानुशतके चालत आलेल्या पताका-दिंडी, वारीकडे आजही जगातील सर्वांत जुनी आणि मोठी सामुहिक यात्रा म्हणून पाहिले जाते. वारकरी चळवळ ही आपल्या समृद्ध परंपरांचे प्रतिक आहे. दिंडी यात्रा ही भारताच्या शाश्वत शिकवणीचे प्रतीक आहे, जी आपल्याला आचरण आणि विचार शिकवते, असे सांगत मोदींनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.