Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर

‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले अंतर’ अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणार्‍या कवी विंदा करंदीकरांचा यांचा आज स्मृतीदिन. ‘विंदा’ करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी रत्नागिरी जिल्यातील घालवली या गावी झाला. विंदा हे कोकणातील पोम्बुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्विक राहिले. पण कोकण नि त्याची दरिद्री अवस्था हा त्यांच्या कायम चिंतेचा नि चिंतनाचा विषय राहिला. उच्च शिक्षण कोल्हापूरमध्ये झाल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्या आधी ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते. विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लिलया हाताळले. या सगळ्यांत विविध प्रयोग केले. विंदांनी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला’ यासारखे बालकवितासंग्रह दिले. 1949 साली प्रथम प्रकाशित झालेल्या ‘स्वेदगंगा’ पासून सुरू मा.विंदांचा साहित्यिक प्रवास सुरु झाला. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. 1949 साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेस्वरांच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. स्वतःच्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. पण विंदा आठवतात ते त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर अनेक कार्यक्रम केले होते. विंदा करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान केला गेला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. विंदांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून ‘कबीर पुरस्कार’आणि ‘कालिदास पुरस्कार’ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. याशिवाय विंदांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले होते. मार्क्स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणार्‍या विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन ‘देणार्‍याने देत जावे’चा अनुभव रसिकांना दिला. विंदा ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे जसे लिहिले तसेच ‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ अशी भावगीतेही त्यांनी लिहिली. विंदांचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. देता देता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावेत, इतके देऊन टाकत हा कवी आपल्यातून निघून गेला. ’विं.दा’ करंदीकर यांचे 14 मार्च 2010 रोजी निधन झाले.

-संजीव वेलणकर, पुणे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply