मोहोपाडा : प्रतिनिधी
खालापूर तालुक्याच्या खेडेगावातील कॉलेजमध्ये शिकणार्या तीन विद्यार्थिनींनी आपल्या दैनंदिन पॉकीट मनीतून बचत केलेल्या पैशातून कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या वाटप करून आदर्श घालून दिला आहे. या तीन तरुणींनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या वह्या वाटपातून गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास उत्साह मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आताच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी शिक्षण असणे गरजेचे आहे, मात्र काहींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत असते. गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून काही जण पुढाकार घेऊन शैक्षणिक साहित्य वाटप करताना पाहायला मिळत असतात. असाच पुढाकार तीन मैत्रिणी घेऊन कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या वाटप केल्या. या तिन्ही मैत्रिणी कर्जत तालुक्यातील इबसार कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून नवघर येथील भक्ती देशमुख, आत्करगावमधील पल्लवी पाटील व रुचिता खेडेकर या तीन मैत्रींनीचे नावे आहेत.