सोलापूर ः प्रतिनिधी : लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांत हालचालींनी वेग घेतला. अनेकांकडून प्रचारासाठीची मैदाने निश्चित होत आहेत. याबरोबरच वातावरण पक्षांच्या झेंड्यांनी ढवळून निघेल यासाठी प्रयत्न करताहेत. प्रचाराचा रंग गडद करणारे देशातील विविध पक्षांचे झेंडे सध्या चीनमधून सोलापुरात दाखल झाले आहेत. प्रचार कार्यक्रम सुरू होताच या झेंड्यांची मागणी होणार असल्याने झेंडे विक्रेत्यांचे कुटुंब आणि नोकरवर्ग विभागणी आणि वर्गवारी करण्याच्या कामात गुंतला आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांचे झेंडे आणि प्रचाराचे अन्य काही साहित्य निवडणूक काळात चीनमधून मागवले गेले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात झेंडे आणि साहित्य चीनमधून उपलब्ध झाले आहे़ अनेक व्यापार्यांच्या गोडाऊनमध्ये हा माल उतरवला गेला आहे़ या मालाचा साठा व्यवस्थित करण्याचे काम कामगारवर्गाकडून सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे़ या काळात प्रचारासाठी बॅच, बिल्ला, बॅनर, झेंडे, स्टिकर अशा अनेक प्रकारचे सर्वच पक्षांना साहित्य लागते़, मात्र हे साहित्य भारतीय उत्पादनापेक्षा कमी किमतीत मिळणार्या चायनीज प्रचार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे़ चायनीज बनावटीचे सर्वच राजकीय पक्षांचे चिन्ह असलेले झेंडे, बिल्ले, टोप्या, उपरणे, छत्र्या, फुगे, मुखवटे यंदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे़ सोलापुरात झेंडे आणि प्रचाराचे साहित्य विक्री करणारे काही व्यावसायिक आहेत़. निवडणूक होईपर्यंत हा काळ आमच्यासाठी लगीनघाईचा म्हणावा लागेल़. निवडणुकीनंतर हे काम राहत नाही. कोणाला किती झेंडे, बॅनर, टोप्या लागतील याचा अंदाज घेऊन हे साहित्य मागविले जात आहे़. शिवाय निवडणूक आयोगाचे सार्यांवर लक्ष असते़, असे काही विके्रत्यांनी सांगितले आहे.
नरेंद्र मोदी, राहुल गांधींचे मुखवटे दाखल
लोकप्रिय व्यक्तींची छायाचित्रे आणि मुखवटे वापरण्याचा अनेकांना छंद असतो़. अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे मुखवटे, झेंडे विक्रेत्यांकडे दाखल झाले आहेत़. लहान मुलांपासून ते सार्याच जणांच्या चेहर्यावर बसतील असे प्लास्टिक मुखवटे दाखल झाले आहेत़. आचारसंहिता असल्यामुळे हे साहित्य अद्याप बाहेर पडलेले नाही़.
ईव्हीएम प्रात्यक्षिक मशीन
स्थानिक पातळीवर योग्य उमेदवाराला मतदान व्हावे, याबाबत मतदारांमध्ये प्रबोधन करण्यासाठी लागणारी ईव्हीएम मशीन झेंडे विक्रेत्यांनी स्थानिक पातळीवर बनवली आहे. मतदान केल्यानंतर येणारा ‘बीप’ आवाज, मशीनवरील उमेदवाराच्या चिन्हाची ओळख अशा अनेक बाबींची माहिती या प्रात्यक्षिक मशीनद्वारे दिली जाणार आहे़.