लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात प्रवेशाच्या सर्व ठिकाणी चेक पोस्टवर विशेषतः दारूची वाहतूक, मोठ्या प्रमाणावर पैसे नेण्यात येत आहेत का यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणेलादेखील अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
आगामी महत्त्वाच्या धार्मिक व सामाजिक सणांचा वापर करून कोणीही राजकीय स्वरूपाची भाषणे करू नये, असे आवाहनही त्यांनी केले असून यासंदर्भातही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. विशेषतः
शिमगोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी, चवदार तळे येथील कार्यक्रम यामध्ये राजकीय नेते सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांना त्या उत्सवांच्या अनुषंगानेच भाषणे करावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीसाठी 28 समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांना व विविध पथकप्रमुख अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर पथके, भरारी पथके, व्हिडीओ पथके आणि एका निवडणूक खर्चाविषयक पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार याद्या मतदानापूर्वी 10 दिवस अगोदर अद्ययावत होणार आहेत. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठीही सुविधा आहेत.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून चार हजार दिव्यांग व्यक्तींना त्या व्यवस्थित चालू शकत नाही म्हणून सुविधाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मतदान केंद्रे अंधारलेली नसावीत याची काळजीही घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
परवानग्या सुलभ रीतीने मिळणार
सर्व राजकीय पक्षांना आवश्यक त्या सर्व परवानग्या सुलभ रीतीने व नियमाप्रमाणे मिळतील. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आचारसंहिता सुरू होताच सर्व ठिकाणचे झेंडे, बॅनर्स काढण्याची कार्यवाही झाली आहे. एसटी बसेस व इतर ठिकाणच्या जाहिराती तातडीने काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोशल मीडियावरील सर्व मजकुरांवर एका एजन्सीमार्फत 24 तास लक्ष ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
समुद्रकिनारी पोलिसांच्या 13 गस्ती चौक्या असून पुलवामा हल्ल्यानंतर त्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्या सक्रिय आहेतच, शिवाय काही गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 41 जणांना पकडण्यात आले आहे. फरारी गुन्हेगारांचीदेखील यादी तयार असून त्यांवरही कारवाई होत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी पत्रकारांना दिली. पोलीस कर्मचार्यांनाही अतिशय उद्बोधक रीतीने मोबाइलच्या माध्यमातून या निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
-जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग