मुंबई : प्रतिनिधी
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचे मंगळवारी (दि. 17) निधन झालेे. यामुळे देशातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
संबंधित 64 वर्षीय व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली. कर्नाटकमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात 68 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता महाराष्ट्रात एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची लागण झालेल्यांपैकी सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची राज्यातील संख्या 39वर पोहोचली आहे, तर केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशात नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सव्वाशेच्या वर गेली आहे.
शासकीय कार्यालये बंद राहणार नाहीत!
सार्वजनिक वाहतूकही सुरूच राहणार
मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. याविषयी योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी
(दि. 17) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात येणार नाही, पण आवश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनाने मर्यादित स्वरूपात काम करण्यास सांगितले आहे. खासगी व्यतिरिक्त इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांतून नियमित काम सुरूच राहील, तर खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली.
राज्यातील सर्व स्थानिक निवडणुका स्थगित
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. ही बाब लक्षात घेऊन आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर स्थगित केले आहेत.
23 एक्स्प्रेस रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अशा शहरांना जोडणार्या एकूण 23 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात राजधानी एक्स्प्रेससह डेक्कन, प्रगती, हावडा, दुरंतो, नंदीग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे. त्याचप्रमाणे गर्दी असलेल्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील तिकीट 10 रुपयांवरून थेट 50 रुपये करण्यात आले आहे.
देशातील रुग्णांचा आकडा 137
नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एकूण 137 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यातील 14 जणांवर यशस्वी उपचार झालेत, तर तीन जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (दि. 17) सायंकाळी जाहीर केली. दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. तो अमेरिकेहून आला आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण झाली. पुण्यातील रुग्णांची संख्या 17 आणि राज्यातील आकडा 41वर पोहोचला आहे. पिंपरीमधील ही व्यक्ती अमेरिकेतून दुबईला गेली आणि नंतर मुंबईमार्गे पुण्यात आली आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिसा आणि प्रवाशांना लागू केलेल्या नियमांची माहिती व मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. भारत दौर्यावर आलेल्या परदेशी नागरिकांचीही मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.