Breaking News

ब्रॉड-अँडरसनने इंग्लंडला तारले; अटीतटीची चौथी कसोटी अनिर्णीत

सिडनी ः वृत्तसंस्था

अत्यंत रंगतदार झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपल्या शेवटच्या विकेटचा बचाव करीत ऑस्ट्रेलियाचे विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. सिडनीत झालेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाने 388 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या झॅक क्रॉवली आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी बिनबाद 29 अशी मजल मारली, पण पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंड, पॅट कमिन्स यांनी चांगला मारा करीत इंग्लंडची वाईट अवस्था केली. शेवटच्या दोन षटकात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड झुंज देत होते. या दोघांनी ही दोन्ही षटके खेळून काढत सामना ड्रॉ केला. बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी दोन्ही डावांत शानदार फलंदाजी करीत इंग्लंड संघाला सिडनीमध्ये सन्मान राखण्यास मदत केली. दुसर्‍या डावात स्टोक्सने 60, तर बेअरस्टोने 41 धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी 388 धावांची गरज होती, पण संघ नऊ विकेट गमावून केवळ 270 धावा करू शकला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रावलीने सर्वाधिक 77 धावा केल्या. सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 3-0ने आघाडीवर असून त्यांनी ही मालिका आधीच जिंकलेली आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply