Breaking News

कोरोना व्हायरसमुळे उरण जलवाहतुकीला ब्रेक

उरण : रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अविरत सुरू असणार्‍या मोरा-मुंबई प्रवासी जलवाहतुकीला कोरोना व्हायरसने ब्रेक लावला आहे. या जलमार्गाने नेहमी होत असणारी प्रवासी वाहतूक कोरोनाच्या धास्तीने अर्ध्यापेक्षा कमी झाल्याने लॉन्च मालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याच्या भीतीचा परिणाम मोरा-भाऊचा धक्का या जलवाहतुकीवर होत मोजकेच प्रवासी प्रवास करीत असल्याची कबुली लॉन्चवाल्यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यादृष्टीने खबरदारी घेण्यास राज्य शासनाने पावले उचलली आहेत. या आजाराची लागण होऊ नये यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन शासकीय पातळीवर करण्यात आले आहे. याची लागण आपल्याला होऊ नये यासाठी प्रत्येक जण जपताना दिसत आहे. कोरोना आजाराची दहशत माणसांवर असल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोरा ते भाऊचा धक्का या जलप्रवास वाहतुकीलासुद्धा याचा फटका बसत आहे.

उरणच्या मोरा बंदरातून मुंबईच्या भाऊच्या धक्क्यापर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. या जलमार्गाने मुंबई येथे कामानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मुंबईला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा मार्ग असल्याने उरणच्या प्रवासीवर्गाची या मार्गाला पहिली पसंती आहे. मोरा-मुंबई जलमार्गावरून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत येऊन जाऊन प्रवासी लॉन्चच्या एकूण 40 ते 42 फेर्‍या होतात. या जलमार्गाने दिवसाला किमान अडीच ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवासी जनतेचा मुंबईला जाण्यासाठी वेळ आणि पैसा वाचतो.

इतिहासात प्रथमच बिकट अवस्था

कोरोना व्हायरसच्या जगभरात पसरलेल्या दहशतीचा फटका मोरा मुंबई जलवाहतुकीला बसला असून सध्या या मार्गाने दिवसाला किमान 300 ते 400 प्रवाशीच प्रवास करतात. याचा फटका प्रवासी लॉन्च चालकांना बसला असून त्यांचा खर्चही वसूल होत नसल्याचे दिसून येते. कोरोनाच्या धास्तीने प्रवासीवर्गाने अघोषित बंद केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासात इतकी मंदी प्रथमच असल्याचे लॉन्च चालकांनी मान्य केले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply