Breaking News

संकल्प आणि संयम

कोरोना विषाणूच्या आजारावर आजवर कुठलेही औषध उपलब्ध झालेले नाही. आणि प्रतिबंधात्मक लस देखील निर्माण झालेली नाही. स्वयंनिग्रह हा तूर्त तरी एकमेव उपाय आहे. संकल्प आणि संयम हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आपण स्वस्थ तर जग स्वस्थ हा खरा मंत्र आहे असेही ते म्हणाले. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईस देशभरात  तोंड फुटले असताना या लढाईचे नेतृत्व नेमके कोण करीत आहे हे स्पष्ट झाल्याने देशातील नागरिकांना थोडा तरी दिलासा मिळाला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी रात्री आठ वाजता सर्व देशवासियांना उद्देशून प्रभावी भाषण करताना या लढाईचे स्वरुप किती तीव्र आहे याची जाणीव करून दिली. कोरोना विषाणूने देशात हातपाय पसरले आहेत. देशाच्या बहुतेक सर्व राज्यांमध्ये या घातक विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. चीन, इटली किंवा इराणसारख्या देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचे आकडे आपल्या देशात सध्या तरी मर्यादित असले तरी कुठल्याही क्षणी कोरोना नावाचा हा अदृश्य शत्रू जीवघेणी चढाई करेल अशी शक्यता आहे. देशाच्या आरोग्य यंत्रणांनी अहोरात्र मेहनत करून या विषाणूचा प्रादुर्भाव सध्या तरी रोखलेला आहे. परंतु संकट अजून टळलेले नाही. पुढील दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून अहोरात्र मेहनत करणार्‍या सरकारी यंत्रणांना साह्यभूत होणे योग्य ठरेल. गर्दी टाळणे, एकमेकांशी संपर्क टाळणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आपल्या हाती आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये अजूनही लोक गर्दी करत आहेत. या लढाईमध्ये गर्दी हा देखील आपला शत्रूच आहे हे देखील सार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे. वारंवार सूचना देऊनही आणि बातम्यांचा पाऊस पडूनही गर्दी अजून का ओसरत नाही? याचे उत्तर दडले आहे ते सामाजिक संभ्रमात. कोरोना विषाणूशी संबंधित इतक्या उलटसुलट बातम्या येत आहेत की त्यामुळे समाजामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. कोरोनाची साथ ही खरोखर जीवघेणी आहे की सरकारी यंत्रणा अतिरेक करीत आहेत असा प्रश्न काही लोकांना पडतो. त्यातून या विषयाचे गांभीर्य कमी होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्यांचे संबोधन इतके प्रभावी आणि विलक्षण गांभीर्याने भरलेले होते की लोकमानसावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल असा विश्वास वाटतो. गेले जवळपास दोन महिने कोविड-19 किंवा कोरोना विषाणूशी सारे जग लढते आहे. या लढाईत चीनसारखे काही देश स्वयंनिग्रहाच्या जोरावर जिंकले तर याच बाबीकडे दुर्लक्ष करणारे इटलीसारखे देश कोरोनाच्या साथीत होरपळत आहेत. या पराभूत देशांच्या यादीमध्ये भारत समाविष्ट होऊ नये याच जिद्दीने ही लढाई लढली पाहिजे असा पंतप्रधानांच्या भाषणाचा मथितार्थ होता. त्यामुळेच त्यांंनी सुचवलेली जनता कर्फ्यूची कल्पना सार्‍या देशाने उचलून धरली नसती तरच नवल. देशभरातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉइज, सफाई कर्मचारी, पोलिस, माध्यम प्रतिनिधी अशा अनेकांचे ताफे सध्या राबत आहेत. विषाणू बाधेची शक्यता असूनही त्यांची लढाई सुरूच आहे. या खर्‍या राष्ट्रसैनिकांना रविवारी संध्याकाळी पाच वाजता मानवंदना देऊन आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply