कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहीत आहेत. 2003मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012मध्ये आढळलेला मर्स हा आजार हेसुद्धा कोरोना विषाणूंमुळे होणारे आजार आहेत, परंतु डिसेंबर 2019मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास कोविड-19 असे नाव दिले आहे.
कोरोनाचे मूळ स्थान : कोरोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्म जीव मानवामध्ये प्रवेश करतात.
कोरोना विषाणू आजाराची लक्षणे : ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्यूमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.
कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?
हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. याशिवाय खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक चोळण्याच्या सवयीमुळेदेखील हा आजार पसरू शकतो. कोरोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णावर त्याच्या लक्षणांनुसार उपचार केले जातात.
कोरोना आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
कोरोना किंवा श्वसनावाटे पसरणार्या स्वाइन फ्लू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी खालील खबरदारी घेणे आरोग्यासाठी हिताचे आहे. श्वसन संस्थेचे विकार असणार्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.
हात वारंवार धुणे, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिशूपेपर धरणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये, फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत.
खाली नमूद केलेल्या व्यक्तीने ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा
-ताप, खोकला व श्वसनास त्रास होणार्या व्यक्ती.
-हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने कोरोनाबाधित देशात प्रवास केला असल्यास.
-प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे.
नवीन कोरोना विषाणू उपाययोजना
कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात पुढील उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
-आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदरांवर प्रवाशांचे स्क्रीनिंग.
-केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाबाधित देशातून येणार्या प्रवाशांची स्क्रीनिंग मुंबई, पुणे, नागपूर या विमानतळावर व राज्यातील सर्व लहान बंदरांवर सुरू करण्यात आले आहे.
-या स्क्रीनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती केले जाते.
– बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा.
– जे प्रवासी कोरोनाबाधित देशातून भारतामध्ये येत आहेत, त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकार्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जाते.
-वुहान (चीन)मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
-इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करून त्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.
-बाधित भागातून येणार्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.
-या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस दूरध्वनीद्वारे दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये कोरोना आजारसदृश लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळविणेबाबत प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे.
-या दैनंदिन पाठपुराव्यामुळे एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
प्रयोगशाळा निदान व्यवस्था
सध्या राज्यात तीन प्रयोगशाळांत नवीन कोरोना विषाणू निदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे.
-कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई.
-इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
विलगीकरण आणि उपचार व्यवस्था
-संशयित कोरोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा केली आहे.
-याशिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
-विलीनीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयांशीही समन्वय ठेवण्यात येत आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सोशल मीडियावर कोरोनासंदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाइनला फोन करून शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चुकीचे मेसेज पसरविणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याविषयीचे
निर्देशही देण्यात आले आहेत.
आपल्या मनातील प्रश्न
-कोविड-19 म्हणजे काय? या आजाराची सुरुवात कशी झाली?
हा नुकताच शोध लागलेला कोरोना विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. डिसेंबर 2019मध्ये चीनच्या वुहानमध्ये या साथीची सुरुवात झाली असून या आजाराचा प्रसार सर्व उपखंडांमध्ये होताना दिसून येत आहे.
हा आजार झाला आहे कसे ओळखावे?
या आजाराची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, सर्दी आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना श्वसनास त्रास होणे, अंगदुखी, घसा खवखवणे किंवा अतिसार असू शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू त्याची सुरुवात होते. बहुतेक लोकांमध्ये (सुमारे 80 टक्के) हा आजार सौम्य प्रकारचा असतो तसेच विशेष उपचार न घेताच स्वतःच्या प्रतिकारशक्तीने या आजारापासून ते बरे होतात.
या आजाराची लागण कशी होते?
खोकला किंवा श्वास घेत असताना नाक किंवा तोंडातून लहान थेंबाद्वारे हे विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे संक्रमित होतात. हे लहान थेंब सभोवतालच्या वस्तू किंवा पृष्ठभागावर पडतात. त्यानंतर इतर लोकांनी अशा वस्तूंना किंवा पृष्ठभागास स्पर्श केल्यास त्यांच्या हातावाटे डोळे, नाक किंवा तोंडातून हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. संसर्ग असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास
आपल्यालादेखील हा आजार होऊ शकतो. म्हणून आजारी असलेल्या व्यक्तीपासून एक मीटर तीन फूट लांब राहणे महत्त्वाचे आहे. (क्रमश:)
मनोज शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड अलिबाग.