पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल व बाजूचा परिसर गाळाने भरला होता. ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान मोहीम राबवून जॅकवेल व पाण्याच्या मार्गावर साचलेला गाळ काढला. त्यामुळे पालीमध्ये वेळोवेळी भासणारी पाणीटंचाई सध्या तरी दूर झाली आहे. अष्टविनयकापैकी एक स्थान असलेल्या पाली गावाला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. नदीलगत असलेल्या जॅकवेलमधून पंपाने पाणी काढून ते साठवण टाक्या व ग्रामस्थांना सोडले जाते. ही जॅकवेल व बाजूचा परिसर गाळ व चिखलाने भरला होता. त्यामुळे पंपात चिखल, शेवाळ व केरकचरा जाऊन पंप नादुरुस्त होत असत. तसेच गाळामुळे पाणीदेखील मुबलक येत नव्हते. परिणामी पालीचा पाणी पुरवठा वारंवार बंद असेे. ही वेळोवेळी भासणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी एक संघर्ष समाजसेवेसाठी या ग्रुपतर्फे श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान करून जॅकवेलमध्ये साठलेला व पाण्याच्या मार्गावर 4 ते 5 फूट साचलेला गाळ काढला. तसेच बाजूचा परिसर स्वच्छ केला. यावेळी ज्याला शक्य झाले त्याने प्रत्यक्ष सहभाग घेऊन तर कोणी आर्थिक मदत करून तर कोणी चहा, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करून या मोहिमेत योगदान दिले. सरपंच अनंत वालेकर, ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे, श्रीकांत ठोंबरे, अजय मुळे, अमित निंबळकर, गणेश सातांबेकर, अॅड. नरेश शिंदे तसेच अरिफ मणियार, सतिश शिंदे, माजी सरपंच गणेश बाळके, रोशन जोशी, एक संघर्ष समाजसेवेसाठी या संघटनेचे सदस्य संदेश सोनकर, कपील पाटील, संकेत खंडागळे, अनुज सरनाईक, स्वप्निल खंडागळे, रोशन रुईकर, योगेश राऊत, संतोष वडके, मिलिंद गोळे, किशोर चौधरी, मोरेश्वर कांबळे, संजोग शेठ, यांच्यासह ग्रामस्थ या मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रीकांत ठोंबरे, गणेश सातांबेकर यांनी स्वतःच्या खर्चातून पंप उपलब्ध करून दिले तर अरिफ मणियार व संदेश सोनकर यांनी अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था केली होती.