Breaking News

महेंद्रसिंह धोनीचे भारतीय संघात पुनरागमन जवळपास अशक्य; सुनील गावसकर यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी

आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमन होणार का, हा प्रश्न गेले अनेक महिने क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम हा धोनीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते धोनीचे भारतीय संघात पुनरागमन आता जवळपास अशक्य आहे. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते.

धोनीला विश्वचषकात खेळताना पहायला मलाही आवडेल, परंतु सध्याच्या घडीला ते अशक्य दिसत आहे. धोनीला सोडून भारतीय संघ आता पुढे गेला आहे. माझ्या मते धोनी कोणत्याही पद्धतीने मोठी घोषणा किंवा कार्यक्रम आयोजित करुन निवृत्ती घोषित करणार नाही. एक दिवस तो शांततेत आपला निर्णय जाहीर करेल, असे गावसकर म्हणाले. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. यानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनीनंतर निवड समितीने ऋषभ पंतला संधी दिली, मात्र पंतला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. नवीन वर्षात भारतीय संघाने वन-डे, टी-20 क्रिकेटमध्ये लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. त्याने ती चोख बजावली. त्यामुळे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आयपीएलमध्ये चांगला खेळ करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते, पण सध्या कोरोनामुळे 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आयपीएलच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन धोनी भारतीय संघात पुनरागमन करणार की नाही हा प्रश्न अजूनही कायम आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply