बंगळुरू : वृत्तसंस्था
कोरोनाच्या भीतीमुळे भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटू बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात अलगीकरण कक्षात आहेत, पण टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने सुरक्षित वातावरणात सरावाला सुरुवात केली आहे.
‘साइ’ केंद्र हे बाहेरील व्यक्तींसाठी बंद ठेवण्यात आले असून नियमित सराव सत्रात इमारतीव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. ‘कोरोनाचा आमच्या सरावावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही नियमितपणे आमचे हात धूत असून खेळाडूंच्या शरीराचे तापमानही वारंवार तपासले जात आहे. आम्हाला सुरक्षित वातावरणात सराव करता यावा याची पूर्ण दक्षता ‘साइ’ केंद्रातील अधिकारी घेत आहेत. प्रशिक्षक आणि पदाधिकार्यांच्या मदतीने आम्ही ऑलिम्पिकसाठी कसून सराव करत आहोत,’ असे भारतीय पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने सांगितले. महिला संघाची कर्णधार राणी रामपाल म्हणाली की, आमच्या सरावात खंड पडू नये याची दक्षता घेण्यात येत असल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. हॉकी संघांना ऑलिम्पिकसाठी सराव करता यावा यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत आहे. आम्ही सर्वच जण आवश्यक खबरदारी घेत आहोत. आम्हाला आमचे उद्दिष्ट साध्य करता यावे यासाठीच ‘साइ’ पदाधिकार्यांचा खटाटोप सुरू आहे.