Breaking News

कोकणात जाणार्या एसटी बसेस फुल्ल

पाली/बेणसे ः प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटकही जिल्ह्यातील तसेच तळकोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात रवाना होत आहेत. परिणामी कोकणाकडे जाणार्‍या एसटी बसेस फुल्ल झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी वाहनांची संख्या वाढल्याने मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गाड्यांना निश्चित स्थळी पोहचण्यास उशीर झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. पाली बसस्थानकात अवेळी येणार्‍या बसेसमुळे प्रवासीवर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच खासगी वाहनचालकांकडून मात्र प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा उठवत दुपटीने भाडे वसूल करून अक्षरशः लयलूट सुरू असल्याचे पाहावयास मिळते.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. पाली, माणगाव, इंदापूर, कोलाड, पेण व वडखळ आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, तर काही वेळेस वाहतूक धिम्या गतीने सुरू असते. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर आणखीनच परिणाम होतो. सुट्यांसाठी अनेकांनी एसटी बसेसचे आधीच आरक्षण केलेले असते. त्यामुळे या बसेस खचाखच भरुन जात आहेत. या पार्श्वभूमीवर महामंडळाने कोकणाकडे जाणार्‍या जादा गाड्याही सुरू केल्या आहेत, मात्र त्यादेखील फुल्ल भरून जात आहेत. जादा गाड्या मधल्या थांब्यांवर थांबत नाहीत, तर शिवशाही व निमआराम बसमध्ये उभे प्रवासी (स्टँडिंग सीट) घेत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास गाड्यांची वाट बघत थांबावे लागते. वेळेत आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी अनेक जण खासगी प्रवासी वाहनांना पसंती देऊन अधिकची रक्कम खर्च करून गावाकडे निघाले आहेत. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांना होतो. ज्या लोकांना खासगी वाहतूक परवडण्याजोगी नाही आणि ज्यांना जवळपासच्या ठिकाणी जायचे आहे त्या लोकांना मात्र एसटीचीच वाट पाहावी लागते. कारण लांब पल्ल्याच्या गाड्या त्यांना घेत नाहीत आणि मधल्या थांब्यावरदेखील थांबत नाहीत. बसेस गच्च भरून येत असल्याने अनेकांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. बहुतांश प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. परिणामी वृद्ध, महिला आणि लहाग्यांचे मोठे हाल होत आहेत. अरूंद रस्ता, रस्त्यावरील हातगाडी व फेरीवाले, दुतर्फा उभी केलेली वाहने आणि वाहनांची जास्त संख्या यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाका, पाली बाजारपेठ, माणगाव शहरात वाहतूक कोंडी होत आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply