अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या नागरिकांची संख्या 740वर पोहोचली असून त्यापैकी 130 जणांचा 14 दिवसांचा निगराणी कालावधी पूर्ण झाला आहे. 521 जणांचे घरातच अलगीकरण केले आहे, तर 88 लोक शासकीय अलगीकरण केंद्रात दाखल आहेत. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात एक नागरिक दाखल आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचे जिल्हा प्रशाससाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मुरूड येथील एका नागरिकाला शनिवारी नव्याने मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून त्याची तब्येतदेखील उत्तम आहे. आतापर्यंत मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात परदेशातून आलेल्या रायगडातील 23 नागरिकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी सात जणांची तपासणी केल्यानंतर स्वॅब टेस्टिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कस्तुरबा रुग्णालयात 16 नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात आली होती. त्यापैकी एका नागरिकाचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. तपासणीअंती 15 नागरिकांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. फक्त एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझेटिव्ह आला असून तो कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.