मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात या विषाणूची लागण झाल्यामुळे दुसरा बळी गेला आहे. 56 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या बळींची राज्यातील संख्या दोन झाली, तर देशातील मृतांचा आकडा सातवर गेला आहे.
मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या संबंधित व्यक्तीला 19 मार्च रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी 21 मार्चला एच. एन. रिलायन्स रुग्णालयात हलवण्यात आले. त्याचा शनिवारी (दि. 21) रात्री 11च्या सुमारास मृत्यू झाला.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार होता. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत व्यक्तीच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-देशातील मृतांचा आकडा सातवर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढू लागला असून, रविवारी (दि. 22) एकाच दिवशी दोन जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरातमधील सुरत आणि बिहारमधील पटणा येथील या व्यक्ती आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. सुरतमध्ये एका 69 वर्षांच्या माणसाचे निधन झाले आहे. बडोद्याच्या रुग्णालयातही एका 65 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे कोरोना रिपोर्ट अजून आले नाहीत. याशिवाय पटणा येथे एका 38 वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. ही व्यक्ती बिहारच्या मुंगेरमध्ये राहणारी होती. काही दिवसांपूर्वीच हा इसम कतारवरून परतला होता. पटणाच्या एम्समध्ये त्याचे निधन झालेे. कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. यानंतर मुंबईत एका पुरुषाला, तर दिल्लीत एका महिलेला कोरोनामुळे जीव गमवावा लागला.