Breaking News

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

पुणे : प्रतिनिधी
राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच या आठवड्यात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांत हा पाऊस हजेरी लावणार आहे.
मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही पावसाने हजेरी लावली होती. या काळात काही भागांत सोसाट्याच्या वार्‍यासह गारपीटही झाली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी पुन्हा कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली होती. परिणामी तापमानाचा पारा वाढत गेला.
विदर्भात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. या ठिकाणी सर्वच भागांतील दिवसाचे तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मराठवाड्यातही सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर, जळगाव या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. कोकण विभागातील मुंबई, अलिबाग, रत्नागिरी आदी भागांतील तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. पुढील दोन दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. रात्रीच्या किमान तापमानात मात्र चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply