Breaking News

वापरलेले पीपीई किट टाकले उघड्यावर नेरळ-कर्जत मार्गावरील घटना; कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी

कर्जत : प्रतिनिधी

महाभयंकर कोरोनाचे संकट एकीकडे असताना दवाखान्यात वापरण्यात येणारे पीपीई किट चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने बेजबाबदारपणे वागणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

कोरोनाने जगभर थैमान घातले असून, कर्जत तालुक्यातही कोरोनाच्या रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे असताना कर्जत-कल्याण मार्गाला लागून असणार्‍या वृद्धाश्रमाजवळील रस्त्यावर कोरोना रुग्णांवर उपचार करीत असताना वापरत येणारे पीपीई किट, मास्क हे रस्त्याच्या बाजूला टाकल्याचे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 26) समोर आला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसभर घरात राहिल्याने शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या भागात येत असतात. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी शुद्ध हवा घेणार्‍या व शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. पीपीई किट आढळून आलेल्या रस्त्याला लागूनच असलेल्या वृद्धाश्रमात काही दिवसांपूर्वी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटनादेखील घडली होती. परिणामी चिंतेचे वातावरण असताना  वापरलेले पीपीई किटअशा प्रकारे रस्त्याच्या कडेला उघड्यावर आढळून आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

डॉक्टर, परिचारिका व स्वचछता कर्मचारी, वाहनचालक यांना वापरण्यात येणारे पीपीई किट तसेच अन्य जैविक कचरा हा एका विशिष्ट पद्धतीने नष्ट करावा लागतो किंवा काही संस्थांमार्फत हा कचरा उचलून नेला जातो, परंतु जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. नक्की हा कचरा कोणी टाकला हे जरी माहीत नसले तरी अशा पद्धतीत हा कचरा कुठेही सार्वजनिक ठिकाणी येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत व एकूणच प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण होत आहे. आता यासंदर्भात स्थानिक रहिवाश्यांकडून बेजबाबदार वागणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply