खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या बिकट संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. खोपोली शहरात पोलिसांच्या कार्याला मदत करणारा तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे व खांबाची स्थिती सुस्थितीत राखण्यासाठी खोपोली आपत्कालीन मदत ग्रुपच्या सदस्यांनी डागडुजी आणि दुरुस्ती केली. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेर्यांचे खांब एकतर वाकले किंवा झुकले होते. त्यामुळे अपघाताच्या शक्यतेसह चित्रीकरण होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. याची दखल येथील आपत्कालीन गु्रपच्या सदस्यांनी घेतली. पोलीस अधिकार्यांना विश्वासात घेऊन हे खांब मंगळवारी (दि. 24) सकाळी सरळ आणि सुरक्षित करण्यात आले. यासाठी खोपोली आपत्कालीन ग्रुपचे प्रमुख समन्वयक गुरुनाथ साठेलकर यांनी मेहनत घेतली. त्यांनी त्यांचे कामगार लावून सीसीटीव्ही कॅमेरे असलेले पोल सरळ आणि मजबूत केले. याकामी त्यांना ग्रुपचे सदस्य अमोल कदम, अताउल्ला खान, उदय धुमाळ यांनी सहकार्य केले.