चार आरोपी न्हावाशेवा पोलिसांच्या ताब्यात

उरण ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात फेरी मारून साड्यांची विक्री करीत असणार्या मनिरुल हशरथ शेख (47) यास चौघांच्या संगनमताने दमदाटी करून त्याच्या हातावर धारदार चाकूने वार करून पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील जंगलाच्या ठिकाणी निर्जनस्थळी असलेल्या रूममध्ये घेऊन जाऊन त्यास त्या रूममध्ये डांबून लाकडी दांडक्याने कमरेच्या पट्ट्याने व चाकूने, तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करणार्या आरोपींना न्हावाशेवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल तालुक्यातील आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण येथे फेरीवाला म्हणून गावात फिरून साड्यांची विक्री करीत असताना फिर्यादी यास संगनमताने साड्या विकत घ्यायच्या असल्याची दमदाटी करून फिर्यादी यांच्याशी भांडण करीत असल्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला असता, आरोपी इसम आशुतोष भरत कोळी, तुषार चंद्रकांत कोळी, परेश नथुराम कोळी व साहील सदानंद कोळी (सर्व राहणार गव्हाण, ता. पनवेल) या चौघांनी फिर्यादी मनिरुल हशरत शेख याच्या हातावर चारदार चाकूने वार करून त्यास जबरदस्तीने गव्हाण गाव येथील जंगलाच्या निर्जनस्थळी असलेल्या रूममध्ये घेऊन जाऊन फिर्यादीस त्या रूममध्ये डांबून ठेवून लाकडी दांडक्याने व कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून, तसेच लथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीकडील सात हजार 400 रुपये किमतीच्या साड्या व रोख रक्कम 1700 असे एकूण नऊ हजार 100 रुपये किमतीचा माल हिसकावून घेतल्याने फिर्यादीने न्हावाशेवा पोलिसात तक्रार केली.
न्हावाशेवा पोलिसांनी तक्रारीवरून वरील आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चारही आरोपीस तत्काळ अटक केली आहे. याप्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पाटील हे अधिक तपास करीत आहेत, तर या आरोपींना शिताफीने अटक करण्यासाठी पोलीस कर्मचारी राजेंद्र बोराटे, प्रमोद पाटील, प्रसाद वायंगणकर, रूपेश पाटील, रूपेश दराडे व गणेश सोंडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.