कर्जत : बातमीदार
नेरळ येथील शिवप्रेमी तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील रामशेज या किल्ल्यावरून काढलेली शिवज्योत दौड यात्रा दोन दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी नेरळमध्ये पोहचली. 180 किलोमीटर अंतरावरून आलेल्या या शिवज्योत यात्रेच्या स्वागतासाठी सोमवारी सकाळी नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी प्रमाणे येणार्या जयंतीनिमित्त नेरळ येथील शिवप्रेमी तरुण दरवर्षी शिवज्योत दौड यात्रा आणतात. यावर्षी श्याम कडव, जीवन भोईर, प्रथमेश देशमुख, राहुल साळुंके, चिन्मय पवार, भूषण भोईर, कुणाल कांबरी, वेदांत शिंदे, रुपेश चव्हाण, निखिल खडे, भावेश भोईर, किरण भोईर, सुदर्शन भोईर हे नेरळमधील शिवप्रेमी तरुण 19 मार्च रोजी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यावर पोहचले होते. त्यांनी शिवआरती करून शिवज्योत प्रज्वलित केली. त्यानंतर किल्ल्यावरून निघालेली शिवज्योत दौड यात्रा तब्बल 180 किलोमीटरचा प्रवास करून सोमवारी सकाळी नेरळ येथे पोहचली. नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल भाटकर तसेच पदाधिकार्यांनी या शिवज्योत दौड यात्रेचे स्वागत केले. या वेळी सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.