उरण पोलिसांचे आवाहन
उरण : प्रतिनिधी
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचे आदेश दिल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र ठिकठिकाणी नागरिकांचा संयम सुटून विनाकारण घराबाहेर पडत आहेत. आवश्यक असणार्या वस्तू खरेदी करण्यासाठी उरणमध्ये मोठी गर्दी होत आहे. मात्र लोकांनी गर्दी न करता अंतर ठेवून खरेदी करावे, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उरण पोलिसांची केले आहे. लोक विनाकारण घराबाहेर पडतात तसेच एक एक आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एका घरातील दोन ते तीन माणसे घराबाहेर पडतात. त्यामुळे खरेदीच्या ठिकाणी बाजारात विनाकारण गर्दी होते. तसे न करता आपल्या घरातील खाद्यपदार्थ संपल्यास फक्त एकट्यानेच बाहेर पडावे व अंतर ठेवूनच एखाद्या दुकानातून खरेदी करावी. यामुळे गर्दी कमी होईल. मात्र याचे गांभीर्य लक्षात न घेता दुर्लक्ष केल्यास आणि गर्दी केल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ शकेल. अशाप्रकारे गर्दी केल्यानेच चीन, इटली, स्पेन, इराण यासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. पोलीस चोवीस तास सेवेसाठी तत्परतेने सर्वांसाठी सज्ज आहेत. जनतेसाठी आपला जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत. त्यांना सहकार्य केले पाहिजे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले, तर किराणा दुकाने, दूध डेअरी, औषधांची दुकाने चालू ठेवण्यात येतील, असे आवाहन उरणचे वरिष्ठ पोलीस जगदीश कुलकर्णी यांनी केले आहे.