पनवेल : बातमीदार
देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. याचा परिणाम प्रत्येकावर होत आहे. पनवेल तालुक्यातील लॉकडाऊनचा परिणाम आदिवासी समाजावर देखील होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाकडून जीवनावश्यक मदतीची अपेक्षा आदिवासी समाजाकडून केली जात आहे.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत आहेत. बाजूच्या गावांमध्ये मजुरी करायची तसेच लाकडे फोडायची व त्या पैशातून आपला घर खर्च भागवायचा हा नित्यक्रम आदिवासी बांधवांचा असतो. धोदानी आणि परिसरातील आदिवासी बांधव माथेरानला लाकडे व इतर वस्तू विक्रीसाठी घेऊन जात असत मात्र माथेरानला देखील कोणीही येत नसल्याने या वस्तूंची विक्री होत नाही त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही.
तसेच काही आदिवासी बांधव माचीप्रबल येथे जात असत त्यामुळे त्यांना रोजगार मिळायचा मात्र लॉकडाऊन परिस्थितीमुळे तोही बंद झालेला दिसून येत आहे. पनवेल तालुक्यात शेकडोंच्या संख्येने आदिवासी वाड्या आहेत. हजारोची संख्या आदिवासी बांधवांची असून मोलमजुरी करणे हे त्यांचे मुख्य काम. सद्यस्थितीत शेतीतील वाल, मूग, हरभरे काढण्याचे काम सुरू आहे. याचा आदिवासिना रोजगार मिलायचा, मात्र लॉकडाऊन परिस्थितीमुळे त्यांना ते देखील करता येत नाही.
-शासनाकडून मदतीची अपेक्षा लॉकडाऊनमुळे आदिवासी वाड्यांवर व वस्त्यांवर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. तसेच आदिवासी बांधवांना लाकडाची मोळी देखील विकता येत नाही. त्यामुळे आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. हातावर पोट असणारा व खाणारा आदिवासी बांधव कोरोनाच्या संकटाशी लढत आहे यासाठी शासनाने त्यांना मदत करावी.