Breaking News

ज्यांनी मदत केली, त्यांची आठवण ठेवा! माणिकराव जगतापांचा तटकरेंना टोला

अलिबाग : प्रतिनिधी

तटकरे साहेब आता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवून पुढे काम करा… हे मी जाहीर बोलतो, कारण हा कृष्ण कधी रंग बदलेल याचा नेम नाही, असा टोला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी सुनील तटकरेंना भरसभेत लगावला. ते अलिबागेत बोलत होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी (दि. 29) दाखल केला. त्यापूर्वी अलिबाग येथे झालेल्या आघाडीच्या सभेत जगताप यांनी आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन तटकरेंना केला. या वेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, आमदार सुरेश लाड, सुभाष पाटील, संजय कदम, अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते.

शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन पक्ष एकत्र आल्यावर जर तटकरे निवडून आले नाहीत, तर आम्हाला राजकारणातून निवृत्त व्हावे लागेल, असे शेकापचे जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले.

– काँग्रेस भवनात

वेगळी सभा सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु अलिबागमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाण्याचे टाळले. काँग्रेस भवन येथे वेगळी सभा काँग्रेसने आयोजित केली होती. या सभेस सुनील तटकरे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, राजा ठाकूर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, योगेश मगर, अ‍ॅड. जे. टी. पाटील, युवक काँग्रेसचे अ‍ॅड. प्रथमेश पाटील, सुनील थळे आदी उपस्थित होते. त्यामुळे आघाडीत वरून एकी दिसत असली, तरी आतून मात्र दुफळी असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply