कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील अर्ध्या भागात आदिवासी लोकांची वस्ती असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाइलची सुविधा नाही. त्यामुळे त्यांची शाळा ऑनलाइन चालविली जात असली तरी त्या शाळेत विद्यार्थी हजर राहू शकत नाहीत. दरम्यान, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन शिक्षक असलेले तरुण मोतीराम पादिर हे आपल्या लोभेवाडी येथील घरी दररोज आपल्या वाडीमधील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे जुलैपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग त्यांच्या शाळेकडून भरविले जात आहेत. त्यामुळे मोबाइलअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येतात. जिल्हा परिषद शाळांनीही ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली. अशा वेळी ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकत असूनही शाळा भरत नसल्याने शाळेचा अभ्यास करू शकत नाहीत. याबाबत कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी ज्या वेळी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासन घेईल, त्या वेळी शिक्षकांनी सर्व अभ्यासक्रम प्रसंगी शाळेत जास्त वेळ देऊन पूर्ण करण्याचे धोरण निश्चित करावे, अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सर्वसाधारण सभेत केली.
दरम्यान, विद्यार्थीवर्गाची गैरसोय लक्षात घेऊन मोतीराम पादिर हे शिक्षक धावून आले आहेत. पाथरज ग्रामपंचायतमधील लोभेवाडी येथील शिक्षक मोतीराम पादिर हे कर्जत शहरात कोचिंग क्लासेसमध्ये शिकवतात. त्यांचे क्लासेसही ऑनलाइन सुरू असून त्यासाठी त्यांना कशेळे लोभेवाडी येथून दररोज कर्जत येथे जावे लागते, मात्र आपल्या गावातील विद्यार्थीही शिकले पाहिजेत यासाठी आपल्या घरी ते दररोज दोन तास शाळा चालवतात. गावातील वेगवेगळ्या शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना मागील चार महिन्यांपासून मोतीराम पादिर शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांनाही या रात्रीच्या शाळेची गोडी लागली असून दररोज न चुकता विद्यार्थी येथे येतात.
आमच्या संघटनेचे पदाधिकारी असलेले मोतीराम पादिर यांनी आपल्या भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत यासाठी घेतलेला हा वसा निश्चितच कौतुकास्पद आहे. मागील चार महिने त्यांच्याकडून अविरत हे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
-भरत शिद, अध्यक्ष, कर्जत तालुका आदिवासी संघटना