पनवेल : रामप्रहर वृत्त
दरवर्षी कामोठे गावाचा होणारा पारंपारिक पालखी सोहळा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दृष्टिकोनातून रद्द करण्यात आला आहे.
कामोठे गावाचा दरवर्षी पारंपारिक वार्षिक पालखी सोहळा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यासाठी आणि कोरोना पसरू नये यासाठी सरकारने दिलेल्या लॉकडाऊन व सोशियल डिस्टन्स आदेशाचे पालन करण्याच्या पालखी सोहळ्याचे आयोजन यावर्षी रद्द करण्यात आले आहे. यंदा 8 एप्रिलला हा पालखी सोहळा होता. त्या दिवशी फक्त चार ग्रामस्थ व ब्राह्मणाकडून (सुरक्षित अंतर राखून ) पूजन करण्यात येणार आहे. यावेळी गावकरी घरातूनच पालखी पूजन करून दारात पणती लावून, शंखनाद/घंटानाद करीत देवाजवळ देशावरील कोरोना संकट टळावे अशी प्रार्थना करणार आहेत.
लोकनेते दिबा पाटील साहेबांची कर्मभूमी असलेल्या कामोठे ग्रामस्थांनी बांधकाम साहित्य पुरवण्यासाठी स्थापित केलेल्या मजूर सहकारी सोसायटी असो वा, लोकवर्गणीतून बांधलेल्या शाळा व मंदिरे असो ग्रामस्थांनी नेहमीच आपल्या सामाजिक जाणिवेचे भान ठेवून नेहमीच आपल्या परिपक्वतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्या अनुषंगाने हा निर्णयही कौतुकास्पद आहे.