पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोळीवाडा मच्छी मार्केट मधील मच्छी विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण व्यवस्थितरीत्या होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात आयुक्तांकडे निवेदन त्यांनी दिले आहे.
भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरापालिका हद्दीतील फेरिवाल्यांचा सर्व्हे पनवेल महानगरपालिकेमार्फेत करण्यात येत आहे. मात्र या विक्रेत्यांचे काम हे कठीण स्वरुपाचे असल्याने त्यांच्या बोटावरील ठसे योग्यरित्या मशीनवर उमटत नसल्याने त्यांचे सर्व्हेक्षण योग्यरित्या होत नसल्याचे दिसून आले आहे. या मच्छी विक्रेत्यांचे बोटावरील ठशांची छाननी होत नसल्याने त्यांचे फेस डिक्टेशन मशीन किंवा रेटीना स्कॅनिंग मशीनवर सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांची व्यवस्थितरित्या छाननी होऊन त्यांचा होत असलेला सर्व्हे व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोळीवाडा मच्छी मार्केटमधील मच्छी विक्रेत्यांचे सर्व्हे व्यवस्थितरीत्या होण्याकरीता पनवेल महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण प्रकियेमध्ये फेस डिक्टेशन मशीन किंवा रेटीना स्कॅनिंग मशीनची उपलब्धता करुन त्यांची छाननी करण्यात यावी व आतापर्यंत करण्यात आलेल्या मच्छी विक्रेत्यांच्या सर्व्हेक्षणची माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नगरसेविका दर्शना भोईर यांनी आयुक्तांना दिले आहे.