Breaking News

खोपोलीत लॉकडाऊन बेअसर

भाजीपाला, रेशनसाठी रांगा; नगरपालिका व पोलीस सूचना देऊन थकले

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोली नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन व संचारबंदी बेअसर होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नागरिक दैनंदिन भाजीपाला व रेशन दुकानांवर गर्दी करीत असल्याने प्रशासन व्यथित असून लोकांना कोणती भाषा समजेल या संकटात यंत्रणा अडकली आहे. बाजारात व भाजीपाला घेण्यासाठी होणारी गर्दी, कोणत्याही ठोस कारणाशिवाय भटकत फिरणारी टोळकी यांना रोखण्यासाठी खोपोली शहरातील सर्व व्यापारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी नगरपालिका व पोलिसांच्या मदतीने मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसांच्या खोपोली जनता कर्फ्यूचे आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र गुरुवारी (दि. 2) पुन्हा तेच चित्र निर्माण झाले. गुरुवारपासून खोपोली शहरात रेशन दुकानांवर तीन महिन्यांसाठी रेशन वाटप सुरू झाले आहे. रेशन घेण्यासाठी सर्व रेशन दुकानांवर मोठी गर्दी झाली. येथे सोशल डिस्टन्सचा नियम पूर्णपणे पायदळी तुडवण्यात आला. भाजीपाला घेण्यासाठीही मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना नागरिकांना समज द्यावी लागली. गर्दी कमी होण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून सतत आवाहन करूनही नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. यावर उपाय म्हणून शहरातील प्रत्येक वॉर्डात भाजीपाला दुकाने लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच रेशन व किराणा दुकानांवर साधारण एक ते दीड मीटर अंतरावर नागरिकांनी उभे राहून साहित्य घ्यावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी खोपोली पोलीस काहीसे सक्त झाले. दुचाकी व चारचाकी घेऊन  विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडील वाहने जमा करून घेतली.

मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकवाल्यांचा ताप

शहरात मार्निंग व इव्हिनिंग वॉक करणार्‍यांचा वेगळा ताप पोलीस यंत्रणेला सहन करावा लागत आहे. सूचना व आवाहन करूनही स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळी ऐकण्याच्या स्थितीत नाही. झुंडीच्या झुंडी बाहेर भटकत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात कडक मोहीम उघडली असून कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

चौकात बसणार्‍यांवरही होणार कारवाई

शहरातील विविध चौक व नाक्यांवर गप्पा ठोकत बसणार्‍या टोळक्यांची संख्याही कमी होत नसल्याने त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी शहरातील डॉक्टर्स आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे. याबाबतही आता कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply