पनवेल : बातमीदार
संचारबंदी असताना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत त्यामुळे पनवेल परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. या नाकाबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणार्या वाहनांना जाऊ दिले जात आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले
जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेतली जात आहे. मात्र नागरिकांकडून या लॉकडाऊनला फारसे मनावर घेतले नसल्याचे चित्र पनवेल परिसरात दिसून येत आहे. सकाळी व संध्याकाळी नागरिक मोठ्या प्रमानात आपली वाहने घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे पनवेल परिसरातील सुकापुर, करंजाडे, उरण नाका, टोल नाका अशा अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. बॅरिकेड्स लावून पोलीस वाहनांची तपासणी करत आहेत व अत्यावश्यक सेवा पुरवणार्या वाहनांना जाऊन देत आहेत. त्यामुळे अनावश्यक प्रवास करणार्या प्रवाशांना व वाहनांना याचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे. या नाकाबंदीमुळे नागरिक कमी घराबाहेर पडतील असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे संचारबंदी दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नये व घरातच बसून राहावे, असे आवाहन पोलीस या वेळी करताना दिसत आहेत.