पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी ऑनलाइन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळणार आहे. स्थायी समितीच्या गुरुवारी (दि. 3) झालेल्या सभेत हा निर्णय मंजूर करण्यात आला. या वेळी महापालिका हद्दीत नवीन पाईप लाईन टाकणे, पाईप लाईन बदलणे व इतर कामे करण्यासही मंजुरी देण्यात आली.
महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा गुरुवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेस सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक निलेश बावीस्कर, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.
पनवेल महापालिका हद्दीमध्ये नवीन पाईप लाईन टाकणे, पाईप लाईन बदलणे व इतर कामे करणे, पनवेल शहरातील खाडीच्या बाजूने आरसीसी रिटेनिंग वॉल बांधकाम करण्याकामी वाढीव खर्चास मान्यता मिळणे या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. सरस्वती विद्यामंदिर धोकादायक इमारत तोडणे, त्यामधील वापरण्यायोग्य साहित्य साहित्य घेऊन जाणे, भूखंड समतल करणे व त्या बदल्यात महापालिकेस देकार देण्याच्या विषयासही स्थायी समितीने मंजुरी दिली.
कोविड-19 साथरोगाच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता बाह्य स्रोतांकडून (कोविड कामकाजासाठी) कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे, कळंबोली येथील 72 खाटांच्या कोविड समर्पित केंद्रात अत्यावश्यक वेळी आवश्यक असणार्या औषधी, साहित्य खरेदीस मंजुरी तसेच इमुनायझेषन सिरींज खरेदी करणे, आरटी-पीसीआर लॅबउभारणे करिता यंत्रसामुग्री उपकरणे खरेदी करणे या विषयाससुद्धा स्थायी समितीने मंजुरी दिली.
पनवेल महापालिका क्षेत्रातील निर्माण होणार्या घनकचर्याची बाह्य यंत्रणेव्दारे सशुल्क कचरा उचलून विल्हेवाट लावणे तसेच 2021-24करिता सार्वजनिक शौचालय, मुतार्या, स्वच्छतागृहांची अत्याधुनिक तंत्राचा वापर करून यांत्रिक पद्धतीने निर्जंतुकीकरण व दुर्गंधीनाशक रसायनांची दैनंदिन फवारणी करून प्रति दिन दोन वेळा साफसफाई करण्याचा विषय स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …