रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा पोलीस कोरोनाच्या संकटकाळात सतर्कतेने काम करीत असून कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे इन्चार्ज पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपनिरीक्षक, सहा. फौजदार, पोलीस हवालदार यांसह 40 पोलीस कर्मचारी व सहा होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कडकडीत बंदोबस्तामुळे रस्त्यावरील रहदारी बंद असलेली दिसून आली. त्यामुळे कुठेही गर्दी दिसून येत नाही. रेवदंडा पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मोटरसायकलस्वार व इतर वाहनांना बंदी घातली असून रेवदंडा पारनाका, चौल नाका, साळाव चेकपोस्ट, वावे नाका, बोर्ली नाका आदी ठिकाणी रात्रंदिवस पोलिसांचा बंदोबस्त आहे. रेवदंडा पोलीस संचारबंदीची अंमलबजावणी करीत असताना साळाव येथे मशिदीत नमाज पठण करण्यास गेलेल्या सात जणांवर गुन्हा दाखल केला, तर 149 सीआरपीसी अन्वये 15 व्यक्तींना नोटीस देण्यात आल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज पो. नि. सुनील जैतापूरकर यांनी दिली.