पनवेल : प्रतिनिधी – मुंबईच्या नाक्या-नाक्यावरच नव्हे तर संपूर्ण राज्यात हातगाडीवार दिसणारा गरिबांच्या भुकेचा आधार असलेला वडापाव कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाक्यावरून हद्दपार झालेला दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये खाद्य पदार्थांची दुकाने, बेकरी एवढेच कशाला चिकन-मटणाची दुकाने उघडी आहेत. पण सेना प्रमुखांनी मराठी तरूणाला रोजगार मिळावा म्हणून सुरू केलेला वडापावच्या गाड्या मात्र बंद असल्याने अनेकांची उपासमार होत असतानाच लाखो कुटुंबांचा रोजगार ही बुडाला आहे.
झणझणीत बटाटा वडा-पाव, लाल चटणी आणि सोबत तळलेली मिरची असली की गरीब हातावर पोट असलेल्या अनेकांची भूक भागवणार असा हा पदार्थ. मुंबईच्या माया नगरीत आपले नशीब अजमावण्यासाठी आलेल्या अनेक कलाकारांनी वडापाव खाऊन पोटाची भूक भागवून येथील पदपथावर रात्र काढल्याच्या आठवणी जागवल्या आहेत. मुंबईत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्येक नाक्यावर शिव वडापावच्या गाड्या सुरू करायला सांगितल्या. पाफडा-ढोकळा खाणारा गुजराथी आणि मारवाडी समाज ही त्याच्या प्रेमात पडला. त्यामुळे उडप्यांच्या हॉटेलात ही इडली-डोशा सोबत बटाटावड्याला मेनूकार्डमध्ये स्थान मिळाले. आजही चायनीजच्या जमान्यात छबिलदासच्या गल्लीतील श्रीकृष्ण वडापाववाल्या कडील गर्दी कमी झालेली दिसत नाही.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यावर राज्यातील हजारो वडापावच्या गाड्या बंद झाल्या. त्यामुळे या गाड्यांवर काम करणारे कामगार बेरोजगार झालेच पण राज्यात यासाठी दिवसाला लागणार्या हजारो टन कांदे बटाटा आणि मिरचीचा खप कमी झाला. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. खाद्य तेलाची विक्री कमी झाली. यामुळे राज्यात आज वडापाव बंद झाल्याने लाखो लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे.