Breaking News

संसदेत स्त्रीशक्तीचा बोलबाला ; इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल समस्त भारतीयांनी नुकताच अनुभवला. भाजपला मिळालेल्या संपूर्ण बहुमतामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र लोकसभा निवडणुकीचा हा निकाल महिलांसाठीही विक्रमी ठरला आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत. फक्त भाजपच नाही, तर सगळ्याच पक्षांच्या मिळून एकूण 78 महिला खासदार या वेळी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे संसदेत स्त्रीशक्तीचा बोलबाला दिसून येणार आहे. या महिला खासदारांमध्ये भाजप, तृणमूल, बीजू जनता दल या पक्षांमधील महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 1952मध्ये महिला खासदार निवडून येण्याचे प्रमाण सर्वात कमी होते, मात्र या वेळी म्हणजेच 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह विविध पक्षांच्या तब्बल 78 महिला खासदार निवडून आल्या आहेत.

देशभरातून एकूण 724 महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यापैकी भाजपसह विविध पक्षांच्या 78 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. सोनिया गांधी, हेमा मालिनी, किरण खेर या महिला खासदारांनी त्यांची जागा राखत पुन्हा एकदा विजय मिळवला. महिला खासदारांच्या यादीत प्रज्ञासिंह ठाकूर आणि स्मृती इराणी यांच्या नावाचीही नव्याने भर पडली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला, तर स्मृती इराणी यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आश्चर्यकारकरीत्या पराभव केला आहे. याप्रमाणेच लॉकेट चॅटर्जी या बंगाली अभिनेत्रीही तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. उत्तर प्रदेशात जिंकणार्‍या 10 महिलांपैकी रायबरेलीतून काँग्रेसच्या एकट्या सोनिया गांधीच विजयी झाल्या आहेत. इतर सर्व महिला उमेदवार भाजपच्या आहेत. एकंदरीतच या सगळ्या यादीवर नजर टाकल्यास लोकसभा निवडणूक निकालानंतर संसदेत महिलाराज दिसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply