Breaking News

रायगडात मराठी भाषा दिनाचा जागर

…तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही -प्रा. भालेकर

अलिबाग : जोपर्यंत मराठी माणूस आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करीत राहील, तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक भरतकुमार भालेकर यांनी बुधवारी (दि. 27) येथे केले. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन बुधवारी रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जे. एस. एम. कॉलेजचे मराठी विषयाचे प्राध्यापक भरतकुमार भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग एसटी बस आगारात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेबाबत आपले मत व्यक्त केले. देशातील 11 कोटी लोक मराठी बोलत असल्याने ही भाषा कधीही संपुष्टात येणार नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.  आपण रोज घरी, व्यवहारात मराठी बोलतो तसे मराठी संस्कृती, काव्य, साहित्य हे वाचणेही महत्त्वाचे आहे. जेणेकरून मराठी भाषेची गोडी वाढली जाईल, असे मत राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी या वेळी व्यक्त केले, तर एसटीच्या इतर कर्मचार्‍यांनीही कवी कुसुमाग्रज यांच्या कविता व मराठी भाषेबाबत आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न पाटील यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाचे रायगड विभागीय यंत्र अभियंता अरुण वाघाटे, अलिबाग आगार व्यवस्थापक चेतन देवधर, वाहतूक निरीक्षक श्रीकांत सैतावडेकर, वरिष्ठ लिपिक धीरज टीवळेकर यांच्यासह  चालक, वाहक, यांत्रिक विभाग कर्मचारी व प्रवासी या वेळी उपस्थित होते.

नाईक महाविद्यालयात राजभाषा गौरव दिन साजरा

मुरुड : येथील वसंतराव नाईक महाविद्यालय व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस बुधवारी मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. श्रीशैल भैरगुंडे यांनी प्रास्ताविकात वि. वा. शिरवाडकर, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे या प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्याचा आढावा घेऊन या साहित्यिकांच्या पुस्तकांची माहिती दिली. मराठी शिक्षण कायदा व भाषा प्राधिकरण याविषयीच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मोहिमेस पाठिंबा देण्याचे आवाहन कोमसापचे सचिव डॉ. मधुकर वेदपाठक यांनी केले. कोमसापच्या युवाशक्ती या विभागात विद्यार्थ्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन कोमसापचे जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी केले. महाविद्यालय विकास समिती सदस्या वासंती उमरोटकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या एस. पी. रंगूनवाला  व उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनीही या वेळी मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. या वेळी झालेल्या कविसंमेलनात अतिष अग्रावकर, साक्षी तवसाळकर, ममता कार्लेकर, सुप्रिया आगरकर, दिप्ती पाटील, वस्ता नमिरा, सुभेदार अशपाक, अल्पेश म्हात्रे, सरोज शिंदे यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष म्हात्रे यांनी केले. डॉ. मुरलीधर गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास अरुण बागडे, माजी तहसीलदार नयन कर्णिक यांच्यासह विद्यार्थी आणि कोमसापचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

रोहा बस स्थानकात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन

रोहे ः कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. रोहा बस स्थानकातही हा दिन बुधवारी आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त स्वच्छता करून रोहे बसस्थानक रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. सकाळी आगारप्रमुख सोनाली कांबळे यांच्या उपस्थितीत  पत्रकार महादेव सरसंबे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रोहे एसटी आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक उदय जुईकर, अजित पाटील, लेखाकार शलाका खानविलकर,  वाहतूक नियंत्रक खाडे, गायकवाड, विलास धोत्रे, शंकर धोत्रे यांच्यासह वाहक, चालक आणि प्रवासी या वेळी उपस्थित होते.

म्हसळ्यात वाचकवाढीचा संकल्प

म्हसळा : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवारी (दि. 27) म्हसळा सार्वजनिक वाचनालयात वाचक व्ही. सी. सोनवणे यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे आणि वाचनालयाचे सदस्य पी. एम. करडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषाप्रेम यांचा विचार करून त्यांचा जन्मदिवस (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय जागतिक मराठी परिषदेने घेतला असल्याची माहिती ग्रंथपाल उदय करडे यांनी या वेळी दिली. ग्रंथालयाच्या कर्मचार्‍यांनी या वेळी वाचकवाढीचा संकल्प सोडला. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, बी. पी. कदम, जी. जी. पारावे, दामोदर गुरव, प्रवीण जोशी, श्री. व्ही. भदाणे, प्रगती केदार, आशा मोहिते, डी. पी. सरनाईक, व्ही. एम. चव्हाण, आर. एस. मानटे, भाग्यश्री चौलकर, सायली चोगले, धनश्री नाक्ती व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply