मोहोपाडा : प्रतिनिधी
वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात टँकरच्या साहाय्याने जंतुनाशक औषध फवारणी करुन परिसर निर्जंतुक करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नागरिकांना कोरोना विषाणुबाबत मार्गदर्शन व घ्यावयाची खबरदारी यावर सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश बाबूराव खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्याकडून मार्गदर्शन होत आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने घराबाहेर न पडण्याचा सल्लाही वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना दिला जात आहे. कोरोनापासून उपाययोजना म्हणून मोहोपाडा, आली आंबिवली, खाने आंबिवली आदी भागात जंतुनाशक औषध फवारणीकरुन परिसर निर्जंतुक करण्यात आला. तर गणेशनगर, दुर्गामाता व इतर परीसरातही वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक औषध फवारणी होणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी बोलताना सांगितले.