नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा पत्रकार परिषदेत आरोप
माणगाव : प्रतिनिधी
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे 20 एप्रिलपासून आजतागायत कोणतीही सूचना गैरहजर असून मुख्याधिकारी गायब असल्यामुळे माणगावमधील विकासकामे तसेच नागरिकांची कामे ठप्प झाली असल्याचा आरोप नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शुक्रवारी (दि.29) पत्रकार परिषदेत केला. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी मुख्याधिकारी गायब असल्यामुळे विकासकामे होत नसल्याचे सांगितले. मुख्याधिकारी राहुल इंगळे 20 एप्रिलपासून कोणतीही सूचना अथवा रजेचा अर्ज न देता गैरहजर असून त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. नगरपंचायतीचे इंजिनियर आकाश बुवा हेदेखील गेल्या चार दिवसांपासून गैरहजर असल्याने नागरिकांची कामे प्रलंबित असून विकासकामे ठप्प झाली आहेत. याबाबत राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार करणार असल्याचे नगराध्यक्ष पवार यांनी या वेळी सांगितले. मागणी करूनही मुख्याधिकार्यांनी अजूनही आम्हाला प्रोसिडिंग दाखविलेले नाही. सभागृहाची दिशाभूल करणारी उत्तरे मुख्याधिकारी राहुल इंगळे देत असतात. नगरपंचायतीच्या जमा-खर्चाचा अहवाल मागितला असता मला काही माहिती नाही, असे उत्तर त्यांनी दिले. असा अज्ञानी मुख्याधिकारी असेल तर विकासकामे ठप्प होणार आहेत. शासनाने याची दखल घेऊन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची तत्काळ बदली करून माणगाव नगरपंचायतीला दुसरा मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी या वेळी केली. उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, गटनेते प्रशांत साबळे, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, स्वच्छता व आरोग्य सभापती अजित तारळेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती शर्मिला सुर्वे, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक कपिल गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.