नागोठणे : प्रतिनिधी
संचारबंदीचा आदेश असतानाही बाजारहाट करण्याच्या नावाखाली अनेक नागरिक आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याला पायबंद घालण्यासाठी नागोठणे शहरातील मेडिकल दुकाने वगळता दूध डेअरीसह इतर सर्व दुकाने गुरुवार दि. 9 ते मंगळवार दि. 14 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याची माहिती सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून 24 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र अनेक नागरिक भाजीपाला तसेच किराणा सामान खरेदीसाठी दुकानांत गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. याला पायबंद घालण्यासाठी ग्रामपंचायतीने हा कठोर निर्णय घेतला आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर एखादे दुकान उघडे दिसल्यास संबंधित दुकानदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच काही तरुण शहरात दुचाकीवर फिरताना दिसत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत नागोठणे पोलीस ठाण्याचे लक्ष वेधणार असल्याचेही डॉ. धात्रक यांनी स्पष्ट केले.