Sunday , October 1 2023
Breaking News

नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सरकार जागरूक केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सरकार जागरूक असून, रसायनीतील एलएलआयएन प्रकल्प आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रकल्प ठरेल, असा विश्वास केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांनी गुरुवारी (दि. 14) व्यक्त केला. रसायनीस्थित एचआयएल कंपनीत अद्ययावत मच्छरदाणी तयार करण्याचा अर्थात एलएलआयएन प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाचे भूमिपूजन ना. गौडा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन व खते स्थायी समिती अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, युनिडोचे डॉ. रेनेवॅन बेरकेल, केंद्रीय रसायन विभागाचे सचिव पी. राघवेंद्र राव, एचआयएल कंपनीचे सीएमडी एस. पी. मोहंती तसेच अधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी, कामगार आणि नागरिक उपस्थित होते. मंत्री गौडा यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्याचे एक साधन निर्माण होत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी धोरणे तयार केली व त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली आहे. अनोखे निर्णय घेत असताना जनतेचे कल्याण कुठे आहे याचा विचार या सरकारने केला आहे. त्यामुळेच आज आपला देश विविध क्षेत्रांत वेगाने प्रगती करीत आहे. गेल्या साडेचार-पाच वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वाने देशाला विकासाची दिशा दिली आहे. म्हणूनच शेतकरी असो, कामगार असो वा सर्व घटकातील नागरिक सर्वांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. पंतप्रधान मोदींनी देशाच्या प्रगतीचा आलेख वाढवण्यासाठी केलेली कामगिरी उत्कृष्ट ठरली असल्याचे सांगतानाच कालच संसदेत समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी त्यांचे कौतुक केले. मोदी पुन्हा पंतप्रधान बनले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे, असे मुलायम सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटले असल्याचा उल्लेख गौडा यांनी या वेळी केला. एलएलआयएन प्रकल्पाबाबत त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प एचआयएल कंपनी, कामगार आणि नागरिकांच्या पर्यायाने सरकारच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या वेळी त्यांनी रसायनी येथे निर्माण होणार्‍या बीपीसीएल कंपनीसंदर्भात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेणार असल्याचेही आपल्या भाषणातून स्पष्ट केले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक करीत हा प्रकल्प कंपनीसाठी आणि औद्योगिक वसाहतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे म्हटले, तसेच त्यासाठी त्यांनी मंत्रिमहोदय आणि सरकारचे आभार व्यक्त केले. या प्रकल्पामुळे कर्मचार्‍यांवर जबाबदारी वाढली असून, सर्व कामगार, संघटना आणि अधिकारी कंपनीच्या प्रगतीसाठी एकदिलाने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर येथील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मांडून याकडे केंद्राने विशेष लक्ष देण्याची मागणीही केली. एचआयएल कारखाना एचओसीच्या बरोबरीने आला. एचओसीच्या येथे आता बीपीसीएल उभारली जाणार आहे. त्या अनुषंगाने रोजगार उपलब्ध होणार असून, येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि प्रथम स्थानिकांना रोजगाराची संधी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही आमदार ठाकूर यांनी मंत्री गौडा यांच्याकडे केली. खासदार आनंदराव अडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, युनिडोचे डॉ. रेनेवॅन बेरकेल, केंद्रीय रसायन विभागाचे सचिव पी. राघवेंद्र राव यांचीही समयोचित भाषणे झाली.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply