Breaking News

कोरोनामुळे लघु उद्योग अडचणीत

वीटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ

पेण : प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रभाव व यामुळे लॉकडाऊनमध्ये केलेल्या वाढीचा फटका लघु उद्योगाला बसत आहे. यातून पेण तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायही अडचणीत आला असून या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

जानेवारी ते मे महिन्यात वीटभट्टी व्यवसाय तेजीत असतो, मात्र याच कालावधीत लॉकडाऊन सुरू झाल्याने वीटभट्टी व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.वीटभट्टीवर काम करणार्‍या आदिवासी बांधवाना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. भर उन्हात घाम गाळून कष्ट करून दिवसभर काम केल्यानंतर सायकांळी त्याचा मोबदला मिळतो. त्यानंतर रात्री आदिवासी बांधवाच्या घरची चूल पेटते.

 वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा, तूस या वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याने आणि सिमेंटच्या विटांना मागणी वाढल्याने मातीच्या विटांची किंमत स्थिरावली आहे. त्यामुळे पैशांची सांगड घालणे या वीटभट्टी व्यावसायिकांना कठीण होऊन बसले आहे. वीटभट्ट्या बंद असल्या तरी आपल्या कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या घरातील रोजीरोटी चालू राहण्यासाठी वीट व्यावसायिक आदिवासी बांधवांना आर्थिक मदतीशिवाय अन्न-धान्याची मदत करण्यासाठीही पुढे सरसावत आहेत.

वीटभट्टी बंद असल्याने होणारे आर्थिक नुकसान आणि आदिवासी बांधवांना करण्यात येणारी आर्थिक मदत या दोन्ही बाजूंच्या आर्थिक कोंडीत वीट व्यावसायिक सापडले असून आता पावसाचे सावट दिसू लागले असल्याने त्यांच्यासमोर पावसाचेदेखील मोठे नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. ते पाहता आदिवासी बांधवांच्या रोजीरोटीचा आणि वीट व्यावसायिकांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करून वीटभट्ट्या सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी हे व्यावसायिक करीत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात वीटभट्ट्या बंद पडल्याने आदिवासी बांधवांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे, तर हजारो रुपये खर्च करून तयार केलेल्या वीटभट्ट्या लॉकडाऊनमुळे अर्धवट अवस्थेत राहिल्याने या व्यावसायिकांनाही तेवढाच मोठा फटका बसत आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply