Breaking News

रोह्यात गावठी दारूविरोधात पुन्हा कारवाई

रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात पोलिसांकडून गावठी दारूच्या विरोधात छापासत्र अवलंबले असून, काही दिवसांच्या अंतरात पोलिसांनी झापडी येथे दुसरी कारवाई केली. या कारवाईत एकूण 39 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. याआधी बेलवाडी येथे छापा टाकून गावठी दारुचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.

कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्याकरिता घोषित केलेल्या संचारबंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप  परमिट रुम आदी सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत तसेच सर्व परवानाधारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करण्याबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत. तथापि काही समाजविघातक घटक आदेशाची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पद्धतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे अशा प्रकारे छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करणेचे आदेश रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सर्व पोलीस ठाणे यांना दिले होते. त्या अनुषंगाने रोहा पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरू असताना झापडी येथे गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

रोहे पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, सहाय्यक उपनिरीक्षक मदगे, नाईक कुथे, शिपाई नागावकर, येवले, काळे या पथकाने सोमवारी

(दि. 20) सायंकाळी 4.30च्या सुमारास मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे झापडी येथे छापा  टाकला. त्या वेळी जंगल भागात ओहळाच्या किनारी गावठी हातभट्टी आढळली. पोलीस पथकाने दारू काढण्यासाठी लागणारे रसायनाचे ड्रम, गूळमिश्रित रसायन, भांडी असे साहित्य जप्त केले.  या  ठिकाणी आजूबाजूला पोलिसांनी कोण इसम आहेत का याचा शोध घेतला असता, कोणीही मिळून आले नाही. मग दोन पंचांना बोलावून पंचनामा केला व सर्व साहित्य जागीच नष्ट

करण्यात आले.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply