सर्व व्यवहार बंद
कर्जत : बातमीदार – नेरळ येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने हे गाव सील करण्यात आले आहे, तर बाजारपेठ ग्रामपंचायतीने पुढील चार दिवस बंद ठेवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या बंदच्या मंगळवार (दि. 21)च्या पहिल्याच दिवशी नेरळमध्ये शुकशुकाट दिसून आला.
नेरळमध्ये आढळलेला कोरोना रुग्ण नवी मुंबईतील दिघा एमआयडीसीत असलेल्या एका औषध निर्माण कंपनीत फार्मासिस्ट म्हणून काम करीत होता. तो दररोज दुचाकीवरून ये-जा करीत असे. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त कळताच नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी कर्जतच्या प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना याबाबत कळविले तसेच परिस्थिती नियंत्रणात आणून रुग्ण राहत असलेला इमारत परिसर सील केला, तर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष पेठे यांनी कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या घरी असलेले त्याचे कुटुंबीय आई, पत्नी आणि दोन मुले यांची आरोग्य तपासणी करून घेतली.
दरम्यान, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, तालुक्याचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी परिसराची पाहणी करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून शासनाच्या नियमानुसार दीड किलोमीटरचा परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू केली व नेरळ गावात येणारे सर्व रस्ते लोखंडी बॅरिकेट्स लावून सील करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र शांतता पाहावयास मिळत आहे.