खालापूर : प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन व संचारबंदीची मुदत 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर खालापूर तहसील कार्यालयात विविध कामांसाठी भाऊगर्दी होत आहे. या वेळी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणार्या सामाजिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग)नियम धाब्यावर बसविला जात आहे.
तहसील कार्यालयात गाड्यांना पासेस मिळण्यासाठी तसेच शेतीची देवाण-घेवाण करणार्यांची संख्या जास्त असून तहसीलदारांच्या केबिनसमोर हे लोक पायघड्या टाकत आहेत.
खालापूर तालुका अद्याप कोरोनामुक्त असून पोलीस, प्रशासन आणि वैद्यकीय विभाग रात्रंदिवस झटत आहे. खोपोली, खालापूर, चौकमध्ये लॉकडाऊन सुरू असताना दोन व तीन दिवसीय पूर्ण बंद (कर्फ्यू) सर्व संमतीने पाळण्यात आले, परंतु या सर्व प्रयत्नांना तालुक्याच्या विविध भागांतून खालापूर येथे येणारे कारखान्यातील व्यवस्थापक, रेशन दुकानदार आणि चमकेगिरीसाठी आलेली मंडळी सुरूंग लावण्याचे काम करीत आहेत. या सर्वांची मंगळवारी (दि. 21) तहसील कार्यालयात भाऊगर्दी झाली होती. त्यांच्याकडून मास्कचा वापर केला गेला असला तरी काम उरकण्याच्या घाईत सोशल डिस्टन्सिंगचे भान कोणी पाळत नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. येणारी व्यक्ती या कक्षातूनच आत येते. वाहनांना आत परवानगी नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने सामाजिक अंतराचे भान ठेवून नियम पाळणे आवश्यक असल्याचे तहसीलदारांचे म्हणणे आहे, मात्र लोक नियम पाळत नसल्याचे चित्र दिसत आहे.