पनवेल : रामप्रहर वृत्त – अंजुमन-ए-इस्लाम या अग्रणी शिक्षणसंस्थेच्या अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पस या पनवेलमधील प्रख्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांने कोविड -19 संकटात गरजूंना मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधीलकी जपली आहे.
स्थानिक प्रशासनास तत्पर साहाय्य करत महाविद्यालयातील कॅन्टीन किचन, पार्किंग शेड आणि मैदान सद्य आपत्कालीन परिस्थितीत, गरजूंना नाश्त्याची सोय करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वीही लॉकडाऊन दरम्यान गरजूंना वाटप करावयाच्या अन्नधान्य व इतर आवश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी महाविद्यालयांनी आपले काही कक्ष प्रशासनास सुपूर्त केले आहेत.
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांच्या प्रेरणा व पुढाकाराने सुरु झालेले हे मदतकार्य संस्थेचे जनरल सेक्रेटरी जी. ए. आर. शेख, अंजुमन-ए-इस्लाम, नवी मुंबई शिक्षणसंस्थांचे एक्झ्युकेटीव्ह चेअरमन बुर्हान हारिस, काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनूटगी, काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रो. रमजान खाटीक, महाविद्यालयांचे मेंटॉर युसूफ मुल्ला यांच्या व्यवस्थापनांतर्गत, लॉकडाऊन दरम्यानच्या नियमावलींचे योग्य पालन करीत चालू आहे. या सामाजिक कार्यासमवेतच विद्यार्थ्यांशी डिजिटल माध्यमांतून संपर्क साधून संवाद करीत विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे कार्य ही काळसेकर पॉलिटेक्निक आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पस यशस्वीरीत्या करीत आहेत.