Breaking News

गरिबांना अन्नधान्य, जेवण नगरसेवक निधीतून द्यावे

माजी सभापती अमर पाटील यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झाले, परिणामी हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष करून रोडपाली परिसरात अशाप्रकारे हजारो कामगार राहतात. त्यांच्या हाताला काम नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांना दोन वेळचे जेवण किंवा अन्नधान्य पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आपला नगरसेवक निधी त्यासाठी खर्च करण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना दिला आहे. याबाबत माणुसकीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. त्या विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. ही मुदत शासनाने आणखी 3 मेपर्यंत वाढवली आहे. दरम्यान त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. व्यवसायिक, कारखानदार, चाकरमानी, वाहतूकदार यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडले आहेत. त्याचबरोबर मध्यमवर्गीय आणि ज्यांचे हातावर पोट आहे यांची अवस्था बिकट आहे. विशेष करून रोज कामावर जाऊन जे पैसे येतील त्यावर उदरनिर्वाह करणारे परप्रांतीय तसेच राज्यातील दुष्काळी जिल्ह्यातून आलेल्या कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर आजच्या घडीला उपासमारीची वेळ आली आहे. यापैकी अनेक जण पनवेल तालुक्यातील विविध गावांमधील चाळीत राहतात. दरम्यान झोपडपट्टीमधील नागरिकांना विविध सामाजिक संस्था, व्यक्ती, पोलीस आणि शासकीय यंत्रणेकडून अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यालाही काही झोपडपट्ट्या अपवादही असतील. मात्र झोपड्यांमध्ये सामाजिक संस्थांकडून जेवण सुद्धा पुरविण्यात येत होते. तसेच बेघर, भिक्षेकरी यांच्याकरता निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी त्यांची निवास व जेवणाची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. परंतु चाळीत राहणार्‍या हजारो कुटुंबांना मदतीचा हात मिळालेला नाही.

रोडपाली परिसरात अनेक कुटुंब राहात आहेत. ही संख्या पाच ते सहा हजारांच्या घरात आहे. त्यांनी आजतागायत कसेबसे आपल्या पोटाची खळगी भरवले. काहींना तर एक वेळचे सुद्धा जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. यापुढेही लॉकडाऊन किती दिवस राहील याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे अशा गोरगरीब गरजू कामगारांना खर्‍या अर्थाने मदतीची गरज निर्माण झाली आहे. महापालिका हद्दीतील अशा गरिबांसाठी पुढील काळात जेवणाची व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे. किंवा त्यांना अन्नधान्य वाटप करणे गरजेचे आहे. यासाठी पनवेल महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. आपल्या नगरसेवक निधीतून यासाठी पाच लाख रुपये खर्च करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 याकरिता जर राज्य शासनाची परवानगी हवी असल्यास त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. हा प्रस्ताव महासभा मंजुरी देईल या विश्वासावर  स्थायी समितीची मंजुरी घेऊन राज्यशासनाकडे त्वरित पाठवण्यात यावा अशी आग्रही मागणी अमर पाटील यांनी केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply