पनवेल : रामप्रहर वृत्त
कुशल आणि अकुशल कामगारांना महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात परत पाठवण्यापेक्षा त्यांना महाराष्ट्रातच काम उपलब्ध करून दिल्यास राज्याचा महसूल वाढेल, असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये या कुशल वा अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे या कामगारांकडे काम उरले नाही. अशा परिस्थितीत या कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांची जबाबदारी झटकण्यासारखे आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
पुन्हा काम मिळेल या आशेवर अनेक कामगार अजूनही महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीने राज्य सरकारने कोरोनावर मात करून त्यांना काम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी राज्य सरकारने काम उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
महाराष्ट्रात रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन अशी जिल्ह्यांची वैद्यकीयदृष्ट्या विभागणी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यामध्ये रेड झोनचे रूपांतर ऑरेंज झोन आणि ऑरेंज झोनचे रूपांतर ग्रीन झोनमध्ये करण्यासाठी सरकारने वेगाने प्रयत्न करावेत. या कुशल आणि अकुशल कामगारांना काम मिळाल्यास राज्याच्या महसुलातही वाढ होईल, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …