एका महिन्याच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करणार : आरोग्य राज्यमंत्री
मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त
अलिबाग येथे असलेल्या रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था झाली असून, याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) राज्य शासनाचे लक्ष वेधले. या रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी करणार, असा सवाल त्यांनी विधानसभेत केला. त्यावर या रुग्णालयाचे एका महिन्याच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करू, असे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.
रायगड जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, महेश बालदी, अमित साटम, मनीषा चौधरी यांनी आधी तारांकित प्रश्न दाखल केला होता. ‘अलिबाग (जि. रायगड) येथे सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असल्याचे जानेवारी 2021मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे. या रुग्णालयाच्या इमारतीमधील अनेक ठिकाणचे प्लास्टर कोसळले असून, इमारत पडू नये म्हणून इमारतीच्या एका बाजूला टेकूसुद्धा देण्यात आले आहेत. या धोकादायक इमारतीमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या हजारो रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स, नर्सेस यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का? असल्यास याबाबत राज्य शासनाने चौकशीकेली आहे का? व या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे तत्काळ नूतनीकरण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत,’ अशी विचारणा तारांकित प्रश्नातून भाजप आमदारांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती.
या संदर्भात आरोग्यमंत्री टोपे यांनी लेखी उत्तरात सांगितले की, रायगड जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली हे खरे आहे. या रुग्णालयाच्या इमारतीमधील अनेक ठिकाणचे प्लास्टर कोसळले असून, इमारत पडू नये म्हणून इमारतीच्या एका बाजूला टेकूसुद्धा देण्यात आले आहेत हेही अंशत: खरे आहे. आंतररुग्ण इमारतीच्या रॅम्पला लोखंडी खांबाचे टेकू लावण्यात आले आहेत. सद्यस्थितीत रॅम्पची सुविधा बंद करण्यात आली आहे. या आंतररुग्ण इमारतीच्या रॅम्पची पुनर्बांधणी करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रायगड जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाले असून, हे अंदाजपत्रक जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्याची कार्यवाही रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्तरावर सुरू आहे.
याच रायगड जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहातही आवाज उठविला. ते म्हणाले की, रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य स्थान असलेल्या अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाची अवस्था अलीकडच्या काळात बिकट झालेली आहे. एकीकडे कोरोनाच्या संदर्भातील उपचार तिथे सुरू आहेत. त्याचवेळी अन्य सर्व रोगांवरील उपचाराचा भारही या रुग्णालयावर आहे. 200 रुग्णसंख्येची क्षमता जर त्या ठिकाणी असेल तर किमान 300 रुग्णसंख्येची व्यवस्था केली पाहिजे अशी अवस्था आहे. अनेक कक्ष तिथे बंद पडलेले आहेत, तर अन्य कक्षांमध्ये जमिनीवर रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. उत्तरामध्ये मंत्रिमहोदयांनी म्हटले आहे की, इमारतीच्या रॅम्पसाठीचे अंदाजपत्रक प्राप्त झाले आहे आणि मग जिल्हा नियोजन समितीकडून निधी आल्यावर आम्ही दुरुस्ती करू. उत्तरामध्ये म्हटलेय की, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात आम्ही विचार करतोय. मंत्रिमहोदयांनी असे मोघम उत्तर दिल्याने सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांनी असमाधान व्यक्त करून विचारले की, हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी आपण काय व्हायची वाट बघताय, कसा प्रसंग झाला म्हणजे त्यानंतर आपण स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहात?
या रुग्णालयात अनेक विभागांची दुरवस्था आहे. गेल्या सरकारमधील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्या वेळी सीआर्म मशीनसाठी तरतूद केली. कोविडसाठी तो निधी खर्च करून टाकला. त्या ठिकाणी ब्लड बँक आहे. त्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्यासाठी कोणता प्रसंग घडण्याची राज्य सरकार वाट पाहत आहे आणि किती कालावधीत हे सर्व काम केले जाणार आहे, असा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उत्तर देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात उपस्थित केलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून, रायगड जिल्हा रुग्णालयाचे एका महिन्याच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करू, असे आश्वासन दिले.