Breaking News

सामाजिक अंतर राखताना ऐक्याला तडा जाऊ देऊ नका

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक अंतर राखा, परंतु हे करीत असताना सामाजिक ऐक्याला तडा जाऊ देऊ नका. जे लोक परजिल्ह्याच्या वेशी ओलांडून आपल्या गावी आले आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागा.  कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगडकरांना केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीबाबत रायगड जिल्ह्यातील जनतेच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करीत आहे याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी गुरुवारी (दि. 23)  फेसबुक लाईव्हद्वारे रायडकरांशी संवाद साधला. या वेळी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
लॉकडाऊनच्या काळात जे लोक परजिल्ह्यांची वेस ओलांडून रायगडात आले आहेत त्यांची माहिती जमा करण्यात आली आहे. त्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे. या लोकांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्वांनी काळजी घ्यावी. शारीरिक स्वच्छता राखावी, त्याचबरोबर सामाजिक ऐक्यदेखील राखा, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या.
पावसाळ्यापूर्वीची आवश्यक असलेली कामे, पाणीटंचाईचे निवारण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीची कामे, रस्ता दुरूस्ती, शेती अशी कामे टाळेबंदीच्या काळात सुरू राहणार आहेत. पेण येथील गणपती कारखाने सुरू करण्यास अजूनही शासनाने परवानगी दिलेली नाही. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत गणपती कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे जिल्ह्यातील संचारबंदी कधी शिथिल होणार? तसेच रेशनकार्डधारकांचे प्रश्न, पावसाळ्यापूर्वी होणारी कामे, रखडलेली बांधकामे, परराज्यांतील अडकलेले मजूर, जेएसडब्ल्यूू कंपनी, ग्रामपंचायत हद्दीत निर्जंतुकीकरण, नागरिकांची तपासणी, जिल्ह्यात सुरू असलेल्या कंपन्या, कोरोना तपासणी, पाणीटंचाई, पोलीस कारवाई, दारू, गुटखा, सोशल मीडिया आदींबाबत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना  जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर उत्तरे दिली.
बहिष्कार घालू नका; अन्यथा कारवाई! -पोलीस अधीक्षक
जे लोक परजिल्ह्यातून आले आहेत त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे. ज्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे त्यांच्यावरदेखील खास नजर आहे. जे लोक आडमार्गाने जिल्ह्यात येत आहेत त्यांनी तो मार्ग स्वीकारू नये. त्यांनी आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नये. जे लोक आपल्या गावात आले आहेत त्यांच्यावर बहिष्कार घालू नका. जो कुणी बहिष्कार घालून कायदा हातात घेईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply