आरोग्य प्रहर
आयुर्वेदीय ग्रंथकारांनी पोटाच्या वाताच्या विविध त्रासानंतर ‘हृदयरोग’ व्याधीचा क्रम लावलेला दिसून येतो. गुल्मानंतर हृदयरोगाबद्दल विस्तृतीकरण करण्यामागे पोटाचा आणि हृदयाचा संबंध स्पष्ट होतो. प्रत्यक्षात असंख्य वेळेस हृदयाची आशुकारी अवस्था पोटाच्या विकारांची लक्षणे निर्माण होऊन आलेली दिसते. पोटफुगी, ढेकर, छातीत जळजळ, छातीत आग होणे, मूलप्रवृत्ती न होणे, त्याबरोबरच हृदयाच्या ठिकाणी जड होणे, पाठ दुखणे, अस्वस्थता, कधी उलटी या लक्षणांसह हृदयाच्या विकृतीची अवस्था निर्माण होते. यावरून उदारास्थ व्याधींचा संबंध स्पष्ट होतो.
दुसर्या बाजूने विचार केल्यास पोटाच्या विकारांवर मात न केल्यास योग्य प्रकारे पथ्य न पाळल्यास हृदयरोग निर्माण होऊ शकतो असेही म्हणता येईल, तसेच हृदयरोग ही एक प्राणघातक ठरणारी व्याधी असून लक्षणे अंगावर काढत राहिल्याने अतिप्रकारचा आत्मविश्वास स्वत:वर ठेवल्याने जीवावर बेतते. म्हणून योग्य प्रकारे दक्षता, उपचार, पथ्य पाळून शरीर संरक्षण करावे. हृदयरोगाचे असंख्य प्रकार आयुर्वेदीय ग्रंथांनी वर्णन केले असून स्थूल प्रकारे सर्व हृदयरोगांसाठी पथ्य-अपथ्य वर्णन केली आहे. गार पाणी, अतिथंड पाणी, साठवून ठेवलेले पाणी, अशुद्ध पाणी हृदयरोग असताना टाळावे. काही घरांमध्ये फ्रीजमधील थंड पाणी तत्काळ पिण्याची सवय असते हे सर्वप्रथम टाळणे महत्त्वाचे ठरते. थंड व गरम एकाच वेळी खाणे हृदयरोग्यांना त्रास देणारे असून विरुद्धाहार टाळणे गरजेचे आहे. हृदयरोगाचे अपथ्य पाहताना खूप व्यक्तींच्या मनात द्विधा निर्माण झाली असेल. हृदयरोग्याच्या अपथ्यांमध्ये आयुर्वेद शास्त्रकारांनी केवळ साठणारी चरबी, वाढणारी चरबी, रक्तवाहिन्यांची विकृत अवस्था असा एकात्मिक विचार केला नसून हृदयाशी संबंधित सर्वच पदार्थांचा विचार केलेला दिसून येतो. या अपथ्य आहाराच्या पालनामुळे अनेक रुग्णांना सकारात्मक लाभ झालेला दिसून येतो. हृदयरोगींनी केवळ दूध सेवन करू नये. धारोष्ण दूध सेवनाला निषिद्ध मानले असले तरी सध्या धारोष्ण दूध घेणार्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी असेल. थंड दूध या रुग्णांनी पूर्णत: टाळावे. दुधापासून निर्माण होणारे खव्याचे प्रकार, अगदी प्रसादसुद्धा हृदयरोगींनी टाळणे आवश्यक ठरते. सध्याच्या काळात प्रचलित झालेला ‘पनीर’ हा प्रकार हृदयरोगींना अत्यंत त्रासदायक असून चीज, बटरही टाळावे.