देशाच्या संसदेवर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 13 डिसेंबर रोजी 22 वर्षे पूर्ण होत असतानाच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे वेळी दोन तरुणांनी लोकसभेच्या गॅलरीतून खाली उडी मारून सभागृहात पिवळ्या धुराचे लोट पसरवले तर अन्य दोघांनी संसदेबाहेर गोंधळ माजवला. या घटनेमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेविषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा बुधवारी स्मृतीदिन असताना त्याच दिवशी दोन तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून पिवळ्या धुराचे लोट पसरवले. संसदेतील घुसखोरीच्या या प्रकरणात एकंदर चार जणांना अटक करण्यात आली असून घुसखोरी करणार्या दोघा तरुणांपैकी एक जण महाराष्ट्रातील असल्याचे उघडकीस आले आहे. संसदेतील घुसखोरीच्या या घटनेत दोन जणांनी सभागृहात गोंधळ माजवला तर आणखी दोन जण संसदेबाहेरही गोंधळ घालत होते. या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. सुरक्षा भेदून गॅलरीतून सभागृहात उड्या मारणार्या दोघा तरुणांमध्ये सागर शर्मा व मनोरंजन यांचा समावेश असून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारशीवरून लोकसभेत प्रवेशाचा पास मिळवला होता. या घटनेतील महाराष्ट्रीय तरुण अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी येथील रहिवासी असून त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तो सैन्यभरतीसाठी तयारी करत होता असे समजते. या घटनेत नीलम कौर नावाच्या एका 42 वर्षीय महिलेचाही समावेश असून ती हरयाणातील हिसार येथे राहणारी आहे. ती उच्चशिक्षित असून डाव्या विचारसरणीची असल्याचे आढळले आहे. इन्स्टाग्रामवरून एकमेकांच्या संपर्कात राहात या चार जणांनी हल्ल्याची तयारी केल्याचे समजते. या घटनेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उड्या मारल्या आणि त्यानंतर ते बाकांवर चढून उड्या मारत पुढे जाऊ लागले. हा प्रकार दिसताच काही खासदारांनी चपळाईने त्यांना पकडले. पकडले जातानाच त्यांनी बुटातून सभागृहात पिवळा धूर पसरवला. दरम्यान खासदारांनी त्यांना चांगला चोप देऊन सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. घुसखोरीच्या या घटनेचा खलिस्तान चळवळीचा समर्थक गुरपतवंतसिंग पन्नू याने अलीकडेच दिलेल्या धमकीशी काही संबंध आहे का याचीही चर्चा होते आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी, 6 डिसेंबर रोजी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा संसदेवर हल्ला करण्याचा इशारा एका व्हिडिओद्वारे दिला. संसदेवर यापूर्वी झालेल्या हल्ल्याला 13 डिसेंबर रोजी 22 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुन्हा संसदेवर हल्ला केला जाईल असे त्याने आपल्या व्हिडिओत म्हटले होते. 13 डिसेंबर 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याला नंतर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पन्नू याच्या व्हिडिओमध्ये अफझल गुरूचा फोटोही झळकवण्यात आला होता. पन्नूने दिलेल्या इशार्याचा बुधवारी संसदेत झालेल्या घुसखोरीशी संबंध आहे अथवा नाही हे तपासाअंती समोर येईलच. संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनीच पुन्हा संसदेत अशी घुसखोरी होणे हे निश्चितच संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचे उघड करणारे आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन यामागे कोणाचा हात आहे हे तपासण्याची गरज आहे.